10 हजारांची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विजय राजेंद्र जाधव (वय 33) तलाठी सज्जा शिंगवे अतिरिक्त कार्यभार कुंदलगाव ता .चांदवड जि .नाशिक असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता .चांदवड येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.
कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410, 412, 414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता.
तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील तलाठी विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. या कामासाठी जाधव यांनी तक्रारदाराकडे 15000 रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 10 हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पो. ह .प्रणय इंगळे,
पो कॉ अनिल गांगुर्डे, चालक पो ह विनोद पवार यांनी केली.