नाशिक (प्रतिनिधी) :- एका तक्रारदाराने केलेल्या तक्रारीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने पोषक ठरेल, अशा स्वरूपात वरिष्ठांना पाठविण्यासाठी दीड लाखाची लाच मागून प्रत्यक्षात एक लाखावर तडजोड करणारा निफाड येथील सहाय्यक निबंधक राजेश शंकर ढवळे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी आलोसे हे त्यांच्याकडे दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रारदाराने नोंदविली होती.
त्यानुसार दि. 6 सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष लाच मागणीसंदर्भात पडताळणी करण्यात आली असता ढवळे याने पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात दि. 9 नोव्हेंबर रोजी नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यात सहाय्यक निबंधक ढवळेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दीपक पवार, पोलीस कॉन्स्टेबल संजय ठाकरे, पोलीस नाईक अविनाश पवार, चालक पोहवा संतोष गांगुर्डे या विद्यमान कर्मचाऱ्यांसह तत्कालीन पोलीस नाईक मनोज पाटील यांनी सापळ्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या यशाबद्दल नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.