पुण्यातील गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गॅरेजला आगीने विळखा घातला. आग लागल्याचं कळताच परिसरात आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
दरम्यान आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, आगीत तब्बल १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली आहे. याशिवाय गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरात आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत एक प्रसिद्ध गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये शहरातील अनेक वाहनाचालक तसेच मालक आपली वाहने दुरुस्तीसाठी आणतात. अशातच शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गॅरेजला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, १७ वाहने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय गॅरेजमधील मौल्यवान साहित्य देखील जळाले आहे.