फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
img
Dipali Ghadwaje
थायलंड मधील सुफान बुरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी (१७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे कारखान्यातील अनेक भागात भीषण आग लागली होती. आग विझवताना अग्निशमन दलाला मोठे परिश्रम घ्यावे लागले. अद्यापही आग धुमसत असून बचावपथकाला अडथळे येत आहेत.

एका वृत्त संस्थेने  दिलेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात सुमारे 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडच्या मध्यवर्ती सुफान बुरी प्रांतातील स्थानिक बचाव कर्मचार्‍यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये स्फोटाची जागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाकडून मृतदेह शोधण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. सध्या बचावपथकाकडून युद्धपातळीवर मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बँकॉकपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुफान प्रांतात घडली. हा किनारी भाग असून येथे फटाक्यांचे अनेक कारखाने आहेत. यातील बहुतांश कारखाने जुने आहेत. या भागात दाट लोकवस्ती असल्याने आजूबाजूच्या भागातील लोक या कारखान्यांमध्ये काम करतात. बुधवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात अनेक मजूर काम करीत होते. 

त्याचवेळी कारखान्यात अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. स्फोट झाल्यानंतर क्षणार्धात परिसरात धुराचे मोठ-मोठे लोळ पसरले होते. या घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group