मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात सुरूच आहेत. दोघांमधले वाद काही थांबताना दिसत नाही.

छगन भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत. ते दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कालच्या बीड येथील सभेवर बोलताना जरांगे पाटील यांनी केला. गृहमंत्रालयाने भुजबळांचा जामीन रद्द करुन त्यांना अटक करण्याची मागणी जरांगे यांनी केली होती. आता जरांगे पाटील बोलले म्हणजे छगन भुजबळ देखील प्रत्युत्तर देतील हे साहजिकच आणि त्याप्रमाणे आज त्यांनी जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
खरे म्हणजे तर या जरांगेंनाच अटक करायला हवे. बीडची आमदारांची घरं कुणी जाळली. हॉटेल्स कुणी जाळली. बीड पेटवलं कुणी, लोकप्रतिनिधींच्या, जयदत्त क्षीरसागरांच्या लहान मुलं धुरात गुदमरत होती. त्यावेळी मुस्लीम समाजाच्या तरुणांनी मागील भिंतीवरून उड्या मारून या मुलांना वाचवलं. अरे, कारवाई तर तुझ्यावर झाली पाहिजे होती रे. ज्या पद्धतीने तू सांगतोस की, जो आपल्या विरोधात जाईल. त्यांना चोपून काढा अशा भाषेत ते बोलत आहेत.
जे विरोधात जातील त्यांचे सर्व उमेदवार पाडा. हे तुम्ही बोलतायेत. मारामारीची भाषा तुम्ही केली आणि आज नाभिक समाजाची लोकांची डोकं तुम्ही फोडली. नवनाथ वाघमारेंची गाडी तुम्ही जाळली. लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला तर तुम्ही मार मार मारला. का? तर तो हाकेंसोबत राहतो म्हणून. मरता मरता तो वाचला. तुम्ही चिथावणी देत आहे. तुम्ही हॉस्पीटलमध्ये असता. कोणता आजार तुम्हाला झाला हे देवालाच माहिती आहे, असा टोला भुजबळांनी लगावला. तो कायम माझ्यावर काही तरी बोलतो, म्हणून मी त्याच्यावर बोललो. तो बोलत राहील आणि आम्ही किती दिवस गप्प राहायचं असा सवाल भुजबळांनी जरांगेंच्या टीकेवर केली.
दलित, आदिवासी इतरांसाठी राखीव मतदार संघ आहे. मग ओबीसीसाठी वेगळा मतदार संघ का नाही ? असा सवाल भुजबळांनी केला. त्यांच्या या नवीन मागणीनी राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधले आहे. जरांगे माझ्या मतदार संघात येऊन गेले. पण तरीदेखील माझ्या मतदार संघात काहीच फरक पडला नाही, असा टोलाही भुजबळांनी जरांगे पाटलांना लगावला.