राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर या दोन नेत्यांची भेट झाली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय घडलं याचे उत्तर छगन भुजबळ यांनीच दिलं आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , छगन भुजबळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी आणि मंत्रिमंडळ या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे भुजबळांनी सांगितलं आहे. बैठकीनंतर भुजबळांनी माध्यमांसोबत संवाद साधला तेव्हा 8-10 दिवसानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भुजबळांनी म्हटलं आहे की, 'आज मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक आणि राजकीय विषयदेखील होते. काय, काय घडलं आणि काय चालु आहे, यासंदर्भात चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातूनबऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आहेत. महायुतीला जो महाविजय मिळाला आहे त्यामागे ओबीसीचे पाठबळ आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभलं. त्याचासुद्धा मोठा वाटा आहे. ओबीसींनी विशषेतः आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याचे आभार मानले पाहिजेच. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे. ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही,' असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचे भुजबळांनी सांगितलं.