राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यामध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांना डावललं गेलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचाही समावेश आहे.
मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
बुलडाणा आणि नाशिकमधील ओबीसीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी रास्तारोको आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. अर्धा तास रास्तारोको आंदोलन केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला आहे.
नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
त्यांनी येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासाच्या जवळपास रस्ता रोको आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
छगन भुजबळ यांना मंत्रीपद द्यावे तसेच पक्षात त्यांचा संबंध राखला जावा यासाठी भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी घोषणा देत भुजबळसाहेबांना मंत्री मंडळात न्याय द्यावा अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला आहे.