राजधानीत छगन भुजबळ यांची तोफ धडाडली; म्हणाले इज्जत और लाठी...
राजधानीत छगन भुजबळ यांची तोफ धडाडली; म्हणाले इज्जत और लाठी...
img
दैनिक भ्रमर
दिल्ली :- ओबीसींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी देशभरातील ओबीसी घटक एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे. जर आपल्याला कुणी इज्जत देत असेल तर तर त्याला इज्जत दिली पाहिजे. मात्र जर कुणी आपल्यावर अन्याय करत असेल त्यांच्या विरोधात लढण्याची तयारी देखील आपण सर्वांनी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने ऑल इंडिया सैनी सेवा समितीच्या वतीने ए डॉट हॉल गुरुग्राम दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय जागृती महासंमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी,राष्ट्रीय लोक मोर्चा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार उपेंद्र कुशवाह, खासदार डॉ.कल्पना सैनी, ऑल इंडिया सैनी सेवा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलबागसिंह सैनी, ऑल इंडिया सैनी सेवा समाजाचे दिनेश सैनी, इंद्रजितसिंग सैनी, श्रीपाल सैनी, अलका सैनी, तारासिंग कुशवाह, विजय राऊत, इंद्रलाल सैनी, रामसिंग सैनी, सी. पी. सिन्हा, ताराचंद सैनी, दिपक सैनी, कमलेश सैनी, प्रदीप सैनी, हरभजन सैनी, सुरजमल सैनी, अनिल सैनी, संदीप नाईक, गुरुनाम सिंह, वीरेंद्र सैनी, इंदिरा सैनी, किसन सैनी, राजकुमार सैनी, रेखा सैनी, आझाद सिंह सैनी, अजय सैनी, राधेशाम सैनी, रामेश्वर मेहता, पी.एम.सैनी, जगदीश सैनी, संजीव सैनी, मनमोहन सैनी, कैलास चव्हाण, कुलदीप सैनी, देवेंद्र सैनी, हिंमत सैनी, नरेश सैनी, सुजाता इलवे, राजीव सैनी, तेजपाल सैनी, मोनिका सैनी, नवनीत सैनी, नीलम सैनी, ओमप्रकाश सैनी, रवींद्र कटारिया, शामसुंदर सैनी, गोपाल माळी, रामसिंग सैनी, जयप्रकाश सैनी, नंदकिशोर सैनी, सुभाष सैनी, यांच्यासह देशभरातील सैनी,मौर्य कुशवाह, शाक्य, मरारा आणि माली समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सम्राट अशोक, क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी ज्या सामाजिक सुधारणा केल्या. त्यांचा समावेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत केला. त्यामुळे आज देशातील प्रत्येक घटकाला अधिकारी प्राप्त झाले हे केवळ संविधानामुळेच आहे. त्यामुळे ही सर्व महापुरुष आपली दैवत आहे. या दैवतांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशात ओबीसींना वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आरक्षण मिळत आहे. देशातील ५४ टक्के समाज हा ओबीसी आहे. त्यामुळे देशभरात ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. आजही अनेक राज्यात इतर मागासवर्ग समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी घटकांतील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून यावर लक्ष दिले पाहिजे यासाठी आवाज उठवला पाहिजे. कोणी आपल्या आरक्षणावर गदा आणत असेल तर त्या विरोधात आवाज उठवून त्याला प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातही असे प्रसंग उभे राहिले मात्र ओबीसी समाजाने एकसंघ राहून याविरोधात आवाज उठविला. तसेच महाराष्ट्र राज्यातील सरकारही याबाबत ओबीसी समाजाला मदत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी आपण मागणी करतो आहे. याचे मुख्य कारण देशात आपली जेवढी संख्या आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेत समाजाच्या विकासाठी निधी मिळाला पाहिजे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी स्व.गोपीनाथ मुंडे, लालू प्रसाद यादव, शरद यादव,शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यकाळात १०० हून अधिक ओबीसी खासदारांना एकत्र करून या प्रश्नावर लढा दिला. देशात आज जो ५४ टक्के ओबीसी समाज आहे तो आजही मागासलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रात देखील २७ टक्के राजकीय आरक्षणाचा लढा सुरू असून सुप्रीम कोर्टात आपली ही लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशातील ओबीसी समाज एकसंघ राहिला तरच आपण समाजाचे प्रश्न सोडवू शकतो. "बदल जाओ वक्त के साथ या वक्त को बदलना सीखो, मजबूरी यो को मत कोसो हर हालत मे चलना सीखो" असे सांगत "हम लढेंगे भी और जितेंगे भी" असा विश्वास उपस्थितांना दिला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित "फुले" हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. देशभरातील सर्वांनी हा चित्रपट बघावा. या दांपत्याने केलेलं सामाजिक सुधारणांचे कार्य समाजासमोर येणार आहे. त्यामुळे कुणी कितीही विरोध केला तरी आवर्जून पाहावा असे आवाहन केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group