दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली नाही.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. काल त्यांनी माध्यमांसमोर उघड-उघड नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, आता भाजपा नेते आशिष देशमुख यांनी भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा केला आहे. भाजपा नेते आशिष देशमुख यांनी आमदार छगन भुजबळ यांच्या बाबतीत मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले आशिष देशमुख ?
मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रश्न येत नाही. नवीन सरकार स्थापन झाले आहे. भरघोस आमदार महायुतीकडे आहेत. प्रत्येक पक्षाला ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या संख्येपैकी काही लोकांना संधी देणे गरजेचे होते. म्हणून जुने अनुभवी लोकही त्यात आहेत. नव्या लोकांना अनुभव देण्याच काम सरकारने केले आहे, असंही देशमुख म्हणाले.
"यावेळी कोणाला संधी मिळाली नसेल तर त्यामागे दुसऱ्या कोणाला संधी मिळावी हाच एक हेतू आहे. १९८५ पासून भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्याचे विविध विभागाचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. आज अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल.
मोठा निर्णय म्हणजे देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे भुजबळ साहेब राज्यपाल होऊ शकतात. त्यांच्या पक्षाने तशी योजना बनवली असेल, असा मोठा गौप्यस्फोट आशिष देशमुख यांनी केला.