शिर्डीमधील पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं 2 दिवसीय शिबिर होणार आहे. आज (18 जानेवारी) या शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिराला पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी हे या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन झाल्यावर अधिवेशनाला प्रारंभ होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक भाषण होईल.
दरम्यान मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून नाराज असलेले ज्येष्ठ आमदार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ शिबिरात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाच्या शिबिरात छगन भुजबळ उपस्थिती लावणार की नाही?, याची चर्चा रंगली होती. प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते, असं सांगण्यात येत होते.
मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार असल्याचं आता समोर आलं आहे.
विशेष म्हणजे या शिबिरमध्ये छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार आमने येणार आहे. त्यामुळे शिबिरात नेमकं काय घडणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.