राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या भेटीत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला.
सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या.
“ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार. कोणाविषयी दुष्मनी विसरून जा. आरक्षणाचा भुलभूईय्या संपणार आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काही वाद नाही. मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो, आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो.
मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका. तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो”, असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.