नाशिक : राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मेसेज करून धमकी देणाऱ्या आरोपीला नाशिक आयुक्तालयाच्या गुन्ह्ये शाखा युनिट 1 च्या पथकाने बीड जिल्ह्यामधून अटक केली आहे.

दि.२९/०९/२०२४ रोजी अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या बाबत अंबड पोलीस ठाणे येथे भा. न्या. सं. कलम २९६, ३५१ (४) तसेच माहीती तंत्रज्ञान अधि. कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा त्वरीत उघडकीस यावा यासाठी , पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने , पोलीस उपायुक्त (गुन्हे), प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त,मा. संदिप मिटके यांनी मार्गदर्शन केले होते.
पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली या गुन्हयातील संशयीत इसमाची माहीती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता तो आष्टी बीड भागात असल्या बाबत माहीती मिळाली, त्यानुसार गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस कर्मचारी प्रविण वाघमारे, राम बर्डे, आप्पा पानवळ, सुकाम पवार आदीचे पथक तयार करून त्यांनी आष्टी जि. बीड परिसरात जावुन तेथे आरोपीताचा शोध घेतला असता तो नगर आष्टी रोड येथे सापडला त्यास ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव रविंद्र यशवंत धनक रा साई श्रध्दा कॉलनी, पाथर्डी फाटा नाशिक असे सांगितले.
भुजबळांना केलेल्या संदेशा संदर्भात गुन्हया बाबत विचारपुस करता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आले असुन सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक 3 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.