मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. एकूण सात टप्प्यात निवडणुका पार पडणार असून आतापर्यंत पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व टप्प्यांतील मतदानही नुकतंच पार पडलंय. भाजपनं दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया आघाडी यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर येत्या 4 जूनला येणाऱ्या निवडणूक निकालांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर येतंय.
महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. दरम्यान जर मोदींना २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर शरद पवार २०१४ विधानसभेसारखा भाजपाला पाठिंबा देणार का, असाही सवाल विचारला असता लोकसभा निवडणुकीत भाजपला जर सत्तास्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती अजिबातच करणार नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.
भाजप बहुमताचा आकडा गाठणार? शरद पवार म्हणाले...
शरद पवार म्हणाले की, "त्यांनी सुरुवातीला 400 पारचा नारा दिला, पुन्हा पुन्हा ते सांगत होते. त्यानंतर ते 390 वर आले, 350 वर आले... याचाच अर्थ तो ट्रेंड खाली येतोय आणि जे 400 पार असं बोलत होते, तेदेखील आता जरा जपून शब्द वापरायला लागलेत. त्यामुळे आता ट्रेंड असा दिसतोय की, त्यांचं बहुमत कमी होतंय. त्यामुळे मागची स्थिती आणि आजच्या स्थितीत काही सुधारणा नाही, सर्व काही तसंच आहे. त्यामुळे आताचा ट्रेंड भाजपच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढणार आहेत. मध्यप्रदेश, राजस्थानमध्येही काँग्रेसच्या जागा वाढतील. विशेषतः केजरीवालांचा पक्ष आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय, ते पाहिलं तर त्यांचा नंबर नक्की वाढेल. एकंदरीत संपूर्ण देशाचा विचार केला तर 400 पार तर सोडाच, पण सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा नंबर कुठपर्यंत ते गाठू शकतात, हे सांगणं तसं कठीण आहे. पण हे मात्र नक्की आहे की, त्यांचा नंबर खाली येतोय."
...तर माझ्यासारखे काही लोक कशाचीही अपेक्षा न करता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील : शरद पवार
जर भाजपला थोडेफार आकडे कमी पडले, तर असे कोणते पक्ष आहेत जे त्यांच्यासोबत जाणार नाहीत आणि मग अशा स्थितीत जसं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर दिसेल? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "भाजपसोबत कोणते पक्ष जातील, हे काही सांगता येत नाही. अशी परिस्थिती जर आली, तर माझ्यासारखे काही लोक कशाचीही अपेक्षा न करता इतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. आणि देशाला स्थिर सरकार देण्यासाठी जर संधी असेल, तर त्याचा पुरेपुर फायदा घेतील."
युतीचा प्रश्नच येत नाही : शरद पवार
एक चर्चा अशीही आहे की, जर भाजपला जागा कमी पडल्या तर ते पुन्हा ठाकरेंना साद घालू शकतात, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अजिबात शक्य नाही. अजिबात म्हणजे, अजिबातच शक्य नाही... उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत नाहीत नाहीत... तसेच, पुढे बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तरी युती करणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. भाजपची धोरणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अशा परिस्थितीत युतीचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार म्हणाले. वैयक्तिक संबंध आणि राजकीय निर्णय यात फरक असतो, असंही शरद पवार मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत.