नोटांनी भरलेल्या विमानाचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू, रस्त्यावर नोटा अन्...
नोटांनी भरलेल्या विमानाचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू, रस्त्यावर नोटा अन्...
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विमान अपघाताच्या घटना समोर येत आहे. अशाच झालेल्या विमान अपघातातच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. आता पुन्हा एकदा विमान अपघाताची भीषण घटना समोर आली आहे.  दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हिया येथे शुक्रवारी  संध्याकाळी ६ च्या सुमारास भीषण विमान दुर्घटना घडली आहे. 

बोलिव्हियाची  राजधानी ला पाजजवळील एल अल्टो शहरात बोलिव्हिया एअरफोर्सचं हरक्यूलिस सी १३० या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. हे विमान लँडिंगवेळी रनवेवरून घसरले आणि एअरपोर्टच्या सीमारेषेची जाळी तोडून थेट रस्त्यावर जाऊन पडले. या विमानाने अनेक वाहनांनाही धडक दिली. ही टक्कर इतकी भयानक होती की त्यात अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. 

या दुर्घटनेतील मृत हे विमानातले आहेत की एअरपोर्टजवळील रस्त्यावर जिथे विमानाने वाहनांना धडक दिली त्यातील आहेत का हे अजून स्पष्ट नाही. विशेष म्हणजे हे विमान देशाच्या विविध भागात नवीन नोटा घेऊन जात होते. या अपघातामुळे नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. घटनास्थळी असलेल्या लोकांनी या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या लष्करी विमानाने यापूर्वी सांताक्रूझ शहरातून उड्डाण केले होते आणि धावपट्टीवरून घसरून जवळच्या रस्त्यावर उतरल्यानंतर एल अल्टो येथे अपघात झाला असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, अपघातग्रस्त विमान देशाच्या अंतर्गत भागात चलन घेऊन जात होते असं बोलिव्हियाच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत स्थानिक वृत्तपत्रांनी माहिती दिली आहे. त्याशिवाय अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group