अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेत एअर इंडियाला कारवाईचे आदेश दिले आहेत. सुरक्षिततेचे वारंवार उल्लंघन केल्यामुळं एअर इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हटवण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं. यात २७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या विमान दुर्घटनेची विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे.
फ्लाइट क्रू शेड्युलिंगशी संबंधित नियमांचं वारंवार उल्लंघन करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाल्यानंतर एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश डीजीसीएकडून देण्यात आले आहेत.
या अधिकाऱ्यांमध्ये चुरा सिंह (डिव्हिजनल व्हाइस प्रेसिडेंट), पिंकी मित्तल (मुख्य व्यवस्थापक, क्रू शेड्युलिंग) आणि पायल अरोरा (प्लानिंग - क्रू शेड्युलिंग) यांचा समावेश आहे. एव्हिएशन सेफ्टी प्रोटोकॉल न पाळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे.
डीजीसीएकडून २० जून रोजी हे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट झालं आहे. अवैधपणे आणि नियमांविरोधात जाऊन क्रू मेंबर्सना तैनात करणे, लायसेन्सिंग आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीसंबंधित नियमांचे उल्लंघन, तसेच देखभाल व्यवस्थेत गंभीर उणिवा आदी सुरक्षेविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे.
डीजीसीएच्या आदेशात काय?
एअर इंडियाने तात्काळ प्रभावाने संबंधित तीन अधिकाऱ्यांना हटवावे, असे डीजीसीएने आदेशात म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कारवाई सुरू करून १० दिवसांच्या आत त्याचा अहवाल डीजीसीएला पाठवण्यास सांगितले आहे. याशिवाय उड्डाणविषयक सुरक्षा आणि क्रू संबंधित व्यवस्थापनावर कोणत्याही प्रकारे थेट प्रभाव पडू नये, यासाठी पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांना कोणत्याही पदावरून नियुक्ती देऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस
डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बेंगळुरूहून लंडनला (AI 133) जाणाऱ्या दोन विमानसेवांसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. १६ आणि १७ मे २०२५ रोजी विमानसेवा निश्चित कमाल उड्डाणाच्या वेळेपेक्षा १० तास अधिक चालवण्यात आली होती. या नोटिशीला सात दिवसांच्या आत उत्तर देण्यात यावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.