अहमदाबाद येथे विमान अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबाद विमानतळाहून लंडनच्या दिशेला उड्डाण केलेल्या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या 15 किमी अंतरावर मोठा अपघात घडला. अहमदाबादमधील मेघानी परिसरात हवेत झेपावलेलं विमान अचानक खाली कोसळलं. या विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये दोन नवजात बालकांचादेखील समावेश होता.
या विमानात एकूण 169 भारतीय, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज नागरीकही याच विमानातून प्रवास करत होते. या विमानात 217 प्रौढ प्रवासी होते, अशी माहिती आता समोर आली आहे. या विमानातून एकूण 53 ब्रिटीश नागरीक प्रवास करत होते. तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते.
विमानाने 1 वाजून 39 मिनिटांनी टेक ऑफ घेतलं होतं. त्यानंतर अवघ्या काही क्षणात हे विमान कोसळलं. विमान अपघाताआधी पायलटने धोका असल्याचा मेसेज पाठवला होता. प्रशासन काही मदत करेल त्याआधीच विमान जमिनीवर कोसळलं. या विमान अपघातात एका इमारतीचं देखील नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
या भीषण विमान अपघाताचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ आता समोर आले आहेत. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याचे समजते. मात्र, याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.