युक्रेनियन कैद्यांना घेऊन जाणारे विमान रशियात कोसळले आहे. पश्चिम बेलगोरोड भागात सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. या विमानात 65 कैदी होते. अपघातग्रस्त विमान हे रशियन IL-76 लष्करी वाहतूक विमान आहे. विमानातील सर्व कैद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) हा अपघात झाला आहे. या विमानात युक्रेनचे 65 युद्धबंदी होते. हे सर्वजण युक्रेन लष्कराचे कर्मचारी होते. या युद्धबंदींना बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी नेण्यात येत होते. या युद्धबंदींसह सहा क्रू सदस्य होते. मॉस्कोतील प्रमाणवेळे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून निवासी भागाजवळ रशियन लष्कराचे विमान कोसळले असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओनुसार, पायलटने विमानावरील नियंत्रण गमावले असल्याचे दिसत आहे. हे विमान वेगाने जमिनीवर कोसळले. अपघातानंतर स्फोटाचा आवाज आला आणि आगीचे लोळ उठले असल्याचे दिसून आले.
रशिया आणि युक्रेनदरम्यान मागील दीड वर्षांपासून युद्ध सुरू आहे. युद्ध समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली नाही. अद्यापही दोन्ही देशांमध्ये तोडगा निघाला नाही.