अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एक हृदय पिळवटून टाकणारी कथा समोर आली आहे. राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील डॉ. प्रतीक जोशी आपल्या पत्नी डॉ. कोनी व्यास जोशी आणि तीन छोट्या मुलांसह लंडनला जात होते. पण नियतीने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर अशी आघात केली की, केवळ दोन मिनिटांत संपूर्ण कुटुंबाचे नामशेष उरले नाही.
डॉ. प्रतीक जोशी हे 2016 पासून लंडनमध्ये स्थायिक झाले होते. त्यांच्या पत्नी डॉ. कोनी उदयपूरमधील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. दोघांनी ठरवलं होतं की आता पूर्ण कुटुंबाने एकत्र राहायला हवं.
त्यामुळे कोनी यांनी नुकतीच नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन महिन्यांची प्रतीक्षा करून अखेर व्हिसा मिळाला आणि गुरुवारी त्यांचा लंडनकडे निघण्याचा दिवस उजाडला.
विमानात बसल्यावर प्रतीक, कोनी आणि त्यांची तीन मुलं – प्रद्युत, मिराया आणि नकुल अतिशय उत्साहित होती. त्यांनी विमानात बसल्यावर एक सेल्फी काढला, तोच त्यांच्या कुटुंबाचा शेवटचा फोटो ठरला. त्या फोटोमध्ये आनंद, उत्साह, आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात दिसत होती – पण हे आयुष्य केवळ काही मिनिटांत संपलं.
AI-171 फ्लाईटने टेकऑफ घेतल्यानंतर काही क्षणांतच ते अहमदाबादमधील मेघानी परिसरात कोसळलं. काही सेकंदांत प्रचंड आग लागली. 242 प्रवाशांपैकी 240 जणांचा मृत्यू झाला. त्यात डॉ. प्रतीक, डॉ. कोनी आणि त्यांची तीन निष्पाप मुलं यांचाही समावेश होता. फक्त एक प्रवासी वाचला.
डॉ. प्रतीक जोशी यांच्या बांसवाडा येथील घरी आणि डॉ. कोनी यांचे उदयपूरमधील घर शोकसागरात बुडालं आहे. कुटुंबीय आणि शेजारी स्तब्ध आहेत. अपघाताची बातमी मिळताच दोन्ही ठिकाणी लोकांनी धाव घेतली, पण कोणीही विश्वास ठेवू शकला नाही की, हे कुटुंब आता फक्त आठवणीत उरेल.