अहमदाबादमध्ये १२ जून २०२५ रोजी झालेल्या विमान अपघातानंतर चार दिवसांनी एअर इंडियाच्या ११२ पायलटने अचानक रजा घेतली होती अशी माहिती उघडकीस आली होती.
दरम्यान या रजेमागे AI-171 विमान अपघाताची भीती आहे की दुसरे काही कारण आहे? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे. पण वास्तव असे आहे की एअर इंडिया विमान अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ वैमानिक रजेवर गेले.
रजेवर गेलेल्या वैमानिकांमध्ये ५१ कमांडर आणि ६१ अधिकारी होते. अहमदाबादमधील विमान अपघाताचा मानसिक परिणाम केवळ प्रवाशांवरच नाही तर विमान कर्मचाऱ्यांवरही झाला आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ही परिस्थिती खूप गांभीर्याने घेतली आहे.
DGCA ने विमान कंपन्यांना त्यांच्या विमान कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवारी, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितले की, १६ जून रोजी एअर इंडियाचे ११२ पायलट एकत्रितपणे आजारी रजेवर गेले होते. या पायलटमध्ये ५१ कमांडर आणि ६१ अधिकारी होते. वैमानिकांची रजेवर जाण्याची ही संख्या नेहमीपेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी म्हटले.
मोहोळ म्हणाले की, डीजीसीएने आधीच विमानातील कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रकांच्या (एटीसी) मानसिक आरोग्याबाबत एक वैद्यकीय परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक मानसिक आरोग्य तपासणीसाठी जलद आणि प्रभावी पद्धतींचा सल्ला देते, ज्या डीजीसीएच्या अधिकृत वैद्यकीय परीक्षकांद्वारे सहजपणे अंमलात आणता येतात.
डीजीसीएच्या परिपत्रकातील ठळक मुद्दे
१. मानसिक आरोग्य तपासले पाहिजे : डीजीसीएने एअर इंडियाला मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. ही चाचणी डीजीसीए पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या डॉक्टरांकडून वर्ग १, २ आणि ३ च्या वैद्यकीय तपासणी दरम्यान केली जाऊ शकते.
२. वैमानिक आणि एटीसी यांना प्रशिक्षण द्यावे : सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य समस्या समजून घेण्यासाठी आणि हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. हे प्रशिक्षण त्यांच्यासाठी वेगळे आणि सानुकूलित असावे.
३. विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी 'हा' कार्यक्रम सुरू करा : एअरलाइन्स, फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पीअर सपोर्ट प्रोग्राम सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा कार्यक्रम दंडात्मक नसावा आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक समस्या ओळखण्यास, त्यांना सामोरे जाण्यास आणि सोडवण्यास मदत करेल.