नागपूर : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वकांक्षी योजना आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता.
आता काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओचा आधार घेत वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे. महायुतीला मतांचा दुष्काळ असल्यानं लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे,हे भाजप आमदारानं मान्य केल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे.
भाजप आमदारानं काय म्हटलं?
आम्ही कशासाठी इतकी मोठी भानगड केली आहे, तुम्ही सांगा, इमानदारीनं सांगा, अंत:करणातून सांगा, इतकी मोठी भानगड कशासाठी केलीय. ज्या दिवशी तुमच्या घराच्या पुढं इलेक्शनची पेटी येईल त्यावेळी माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल. यासाठी आम्ही हे जुगाड केलं आहे. सर्वजण खोटं बोलले असतील, मी खरं बोलतोय. माझं खरं आहे की नाही, बोलायचं एक करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे, असं कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केलं.