राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते विकास लवांडे याना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.
वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्याच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता. दरम्यान, त्यांच्यावर अटकेची कारवाई नेमकी का करण्यात आली आहे, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
विकास लवांडे यांच्याविरोधात वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वक्तव्य केल्या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. आता लवांडे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे लवांडे यांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून केला जात आहे.