महत्वाची बातमी !  एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप
महत्वाची बातमी ! एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप
img
Nandini khandare More
महाराष्ट्रातील लालपरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या वळणावर आली आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली  दिवाळी भेट, वेतनवाढ आणि महागाई भत्त्याच्या मागण्यांवरून कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे दिवाळीत गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना याबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र होणार आहे: ३ नोव्हेंबर: राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद आणि तीव्र निदर्शने. ४ नोव्हेंबर: राज्यभरात भव्य द्वारसभा आणि निदर्शने. ५ नोव्हेंबरपासून: मागण्या मान्य होईपर्यंत राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत? दिवाळी भेट व सणउचल: कर्मचाऱ्यांना २५,००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपये सणउचल तात्काळ देण्यात यावी. वेतनवाढ व भत्त्यांची थकबाकी: २०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी आणि २०१८ पासूनची महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करावी. महागाई भत्ता वाढ: जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात यावा. इतर प्रलंबित मागण्या: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, निवडश्रेणी व श्रेणीकरणाचे परिपत्रक रद्द करावे, निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता आणि स्थानिक पूरक भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी.

प्रवाशांवर परिणाम? 

दिवाळीनिमित्त चाकरमानी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. ५ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारल्यास एसटी बस फेऱ्यांवर याचा थेट परिणाम होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group