देवदूतांच्या साक्षीने चालत्या रेल्वे गाडीत महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म
देवदूतांच्या साक्षीने चालत्या रेल्वे गाडीत महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- मुंबईहून भुसावळच्या दिशेने शिट्टी वाजवत एकेक स्टेशन मागे सोडत वेगात जाणारी रेल्वे गाडी, प्रवाशांच्या रंगलेल्या गप्पा, फेरीवाल्यांची घोगऱ्या आवाजात सुरू असलेली विक्री आणि आशा वातावरणात अचानक महिलेच्या सुरू झालेल्या प्रसूती वेदनांनी सर्वजण स्तब्ध झाले. सर्वांचे चेहरे या माऊलीच्या वेदना पाहून चिंताग्रस्त झाले. अशातच रेल्वे कर्मचारी, सहप्रवासी देवदूत बनून आले आणि या अडलेल्या महिलेची सुखरूप डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.

आज पहाटे मुबंई कडून गाडी नंबर 22538 कुशीनगर एक्सप्रेस ने इफरार बरसानी अहमद (वय 22)हा युवक आपली गरोदर पत्नी रिफा इफरार अहमद (वय 19) मूळ राहणार बरेज उत्तरप्रदेश सोबत जनरल बोगी मधून लखनौ कडे जात होते. गाडी ने इगतपुरी सोडल्या नंतर रिफा हिस प्रसुती वेदना होऊ लागल्या.त्यानंतर गाडी थेट नाशिकरोड ला थांबणार असल्याने महिला आणि प्रवासी यांच्या जीवाची घालमेल झाली.नाशिकरोड रेल्वे स्थानकावर स्थानिक डॉक्टर व पोलिसांनी मदत तयार ठेवली होती मात्र देवळाली कॅम्प सोडल्या नंतर रिफा हिने एका गोंडस बाळाला चालत्या गाडीत जन्म दिला. या साठी अनेक सह महिला प्रवासी यांनी रिफा ला मोकळे केले.

नाशिकरोड स्थानकात पहाटे गाडी पोहचताच रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफूलसिंग यादव,लोहामर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश यादव, उत्तम शिरसाठ, बाळासाहेब आव्हाड, भगवान बोडके, स्थानिक डॉ गुंजन पांडे,सुलभ शौचालय चालवणाऱ्या महिला लक्ष्मी कांडडे यांनी रिफा च्या प्रसूतीचे काम बघून तिला आणि बाळाला बिटको रुग्णालयात दाखल केले.या काळात कुशीनगर एक्सप्रेस सुमारे अर्धातास रेल्वे स्थानकात थांबून होती.

दरम्यान , बिटको रुग्णालयातील डॉ चैताली निकम यांनी महिला आणि गोंडस बाळाला तपासून ते दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले.नाशिक रोड येथील आर पी एफ व लोहामार्ग पोलिसांनी परिस्थितीचे गंभीर्य ओळखून महिला प्रवासी नागरिकाची मदत उपलब्ध केल्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group