मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला. याप्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात फायबरची मिलावट केली होती, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. आता त्यांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठा दावा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता. त्यात फायबरची मिलावट होती, असं इथल्या काही बांधवांचं म्हणणं आहे. पश्चिमेकडून वारं येतं होता, मग पुतळा पूर्वेकडे पडायला हवा होता, तो पश्चिमेकडेच कसा काय पडला, या काही शंका आहेत. यात कोणतंही राजकारण होऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. याची सरकारने बारकाईने चौकशी करायला हवी. याप्रकरणी जो कोणी कंत्राटदार असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्ती असतील, त्यांना अजिबात सोडता कामा नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.