पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते . यावेळी त्यांनी कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी PM विश्वकर्मा योजना महत्त्वाची असल्याचं सांगितले आहे . देशातील गरीब, वंचित तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘अमरावती येथे पीएम मित्र पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.’’
दरम्यान , अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.