विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार सभांची धामधूम सुरु आहे. दरम्यान, इगतपुरी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे सभा झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या सभेला संबोधित करणार होते.मात्र याठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे ने सभेचे व्यासपीठ आणि मंडप कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली.
या घटनेत दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. खर्गे हे सभास्थळी पोहण्याच्या काहीवेळ आधीच ही घटना घडली. आता या घटनेची पोलिसांकडून चौकशील केली जाणार आहे.अचानक झालेल्या या दुर्घटनेत काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सुदैवाने अन्य कोणालाही इजा पोहोचली नाही.
दरम्यान , ही दुर्घटना झाली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष खर्गे ओझर विमानतळावर होते. तेथून ते सभेला रवाना झाले होते. व्यासपीठ कोसळल्याने यंत्रणेची एकच धावपळ उडाली. कार्यकर्त्यांनी ध्वनिक्षेपकावरून आवाहन करीत कार्यकर्त्यांना सुरक्षित ळी जाण्याचे आवाहन केले.
कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठाचे पडदे आणि अन्य व्यवस्था सुरळीत केली. त्यानंतर अर्ध्या तासाने काँग्रेस अध्यक्ष खर्गे सभेच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर नियोजनानुसार सभा झाली. इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच ते वादात सापडले होते. त्यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट काँग्रेसचे अध्यक्ष सभा घेत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
दरम्यान , खर्गे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असून त्यांना विशेष सुरक्षा देखील आहे. अशा स्थितीतही सभेच्या व्यासपीठाबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली होती की नाही, याबाबत चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.