मोठी बातमी ! अहमदनगर जिल्हा आता ''या'' नावाने ओळखला जाणार , केंद्र सरकारची मंजूरी
मोठी बातमी ! अहमदनगर जिल्हा आता ''या'' नावाने ओळखला जाणार , केंद्र सरकारची मंजूरी
img
दैनिक भ्रमर
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानत असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मागच्या बऱ्याच काळापासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात यावं, अशी मागणी होत होती. यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनंही केली गेली. या आंदोलनांनंतर राज्य सरकारने नामांतराचं आश्वासन दिलं होतं. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पारित केला आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, त्यामुळे अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची घोषणा केली होती.



इतर बातम्या
Join Whatsapp Group