सध्या राजकारणातील घडामोडींना वेग आला असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत मतभेत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. दरम्यान , गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “राष्ट्रवादीचे २४ आमदार भाजपमध्ये जातील” असा खळबळजनक दावा केला होता. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रोहित पवारांच्या दाव्याला दुजोरा देत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल पटेल? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीमध्ये सध्या तीव्र अंतर्गत कलह माजला असून हा पक्ष लवकरच फुटणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी रोहित पवारांच्या विधानाचे समर्थन केले आणि सांगितले की, रोहित पवारांकडे तब्बल 40 लोकांची नावे आहेत जे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘देशात विरोधी पक्षच राहणार नाही’ असे म्हटले होते, त्याचाच हा भाग आहे. सत्तेत गेल्यावर हे लोक फुटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत, असेही लोंढे म्हणाले.