२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
महायुतीत मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याने यश मिळाल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी पोहोचल्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं औक्षण केलं. यावेळी लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये मिळणार असल्याचे जाहीर केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
लाडक्या बहिणींचं स्वागत. शुभेच्छा. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपर हिट झाली आहे. माझी बहीण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी. काही लोक फिट येऊन चक्कर येऊन पडले आहेत. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धुवून टाकलं आहे.
लाडक्या बहिणींनी लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला १५०० चे २१०० करणार, याचा सुद्धा आपण निर्णय घेतला आहे. तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला आहे. तुम्ही समोरच्या लोकांना डम्पिंगमध्ये टाकून दिलं आहे.
Copyright ©2024 Bhramar