वीजबिल थकबाकी व वीजचोरी बाबत महावितरण संचालकांनी दिले
वीजबिल थकबाकी व वीजचोरी बाबत महावितरण संचालकांनी दिले "हे" निर्देश
img
दैनिक भ्रमर



मालेगाव :- वीज ग्राहकांना देण्यात येणारी सेवा आणखी गतिमान करण्यासोबतच जास्त वीजहानी असलेल्या विद्युत वाहिन्यांवरील वीजचोरी व तांत्रिक गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

यासह चालू वीजबिल व थकबाकीच्या शंभर टक्के वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले. 

मालेगाव मंडळातील विविध कामांचा आढावा संचालक पवार यांनी घेतला. या बैठकीला मालेगाव मंडलाचे अधिक्षक अभियंता जगदीश इंगळे  उपस्थित होते.

संचालक राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरण कर्मचाऱ्यांवरील कामकाजाचा ताण कमी करण्यासाठी  तसेच ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रामुख्याने नवीन वीजजोडणी तत्काळ देण्यासह नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून देण्याची सूचना त्यांनी केली. 

वीज ग्राहकांना द्यावयाच्या सेवा कृती मानकांनुसार विहित कालावधीत सेवा न दिल्यास संबंधितावर दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे हा दंड टाळण्यासाठी ग्राहक सेवा गतिमान करावी असे त्यांनी सांगितले. 

मालेगाव मंडळात ग्राहक संख्येच्या निकषानुसार नवीन कक्ष कार्यालय निर्मिती  मंजुरीबाबत व्यवस्थापन सकारात्मक असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री सौरघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप यासह सर्व योजनांचा प्रचार प्रसार करावा. महावितरण कर्मचाऱ्यांचे विद्युत अपघात होणार नाही यासाठी प्रशिक्षण वर्ग, कर्मचारी जागृती कार्यक्रम घ्यावेत असे निर्देश संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी दिले. 

या बैठकीला मालेगाव मंडळातील कार्यकारी अभियंते, विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group