नाशिक( भ्रमर प्रतिनिधी) - महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या रणजी करंडकाच्या साखळी सामन्याला नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर चहापानानंतर सुरुवात झाली.
दुसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्र संघाने एक बाद 61 धावा केल्या होत्या. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू करण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला भोजनाच्या वेळेस आणि त्यानंतर चहापानानंतर मैदानाची पाहणी करण्यात आली. अखेर साडेतीन वाजता खेळाला प्रारंभ झाला.
नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राच्या बाजूने गेल्यानंतर खेळपट्टी ओलसर असल्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या संघाने घेतला व सौराष्ट्राच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सौराष्ट्रकडून विकेट किपर फलंदाज देसाई आणि चिराग जॉनी यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळायला सुरुवात केली. सकारात्मक खेळ करत असताना चिराग यांनी मारलेले दोन स्टेट ड्राईव्ह उपस्थितांचे टाळ्या घेऊन गेले. परंतु काही वेळातच चिराग पायचित झाला. चिराग तेरा धावांवर बाद झाला. त्याला महाराष्ट्राचा जलदगती गोलंदाज चौधरी याने बाद केले.
खेळ चालू झाला परंतु प्रत्येक षटकानंतर सौराष्ट्राच्या फलंदाजांनी अंधुक प्रकाशाचे अपिल केले ,मात्र काही कालावधीनंतर पंचांना दिवसाचा खेळ थांबवावा लागला. सौराष्ट्रच्या फलंदाजांनी आज एक तासाच्या खेळामध्ये 10 चौकार लगावले. सामना निकली ठरण्याची शक्यता फारच कमी असल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर गुण वसूल करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने आता तिसऱ्या दिवसाचा खेळ केव्हा सुरू होणार याकडेच आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, नाशिककरांनी रविवार असल्यामुळे सामना पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.