नाशिकच्या हवाई वाहतुकीला जागतिकस्तरावर मिळणार गती; नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता
नाशिकच्या हवाई वाहतुकीला जागतिकस्तरावर मिळणार गती; नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता
img
दैनिक भ्रमर



नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. विमानतळ विस्तारीकरणाचे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाची आज सकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण), एचएएलचे वरीष्ठ अधिकारी आदी सहभागी झाले होते. 

या बैठकीत हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (ओझर) येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत बांधकाम करण्यासह अनुषंगिक कामे, प्रांगण, वाहतूक, ॲप्रन, पार्किंग, परिसर विकास आदी कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

यासाठी अंदाजित ५५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विमानतळ विस्तारीकरणबाबत अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य शासन आणि एचएएल यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

त्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा. डीजीसीए, बीसीएएस, एरोड्रम इमर्जन्सी मॅनेजमेंट कमिटीकडून आवश्यक ती परवानगी घेण्याची कार्यवाही करावी. याबरोबरच साधूग्रामच्या जागेच्या स्वच्छतेसह पूर्वतयारी संबंधितांनी ठेवावी, अशाही सूचना प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी दिल्या.

सध्या या विमानतळावरून राजधानी नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर या शहरांसाठी विमान सेवा उपलब्ध असून रात्रीची विमान उतरविण्याची व्यवस्था या विमानतळावर आहे.

विमानतळ विस्तारीकरणामुळे १७ हजार ८०० चौरस मीटर क्षेत्रात प्रवाशी टर्मिनल उभारण्यात येईल. तसेच १ लाख १५ हजार २२० चौरस मीटर क्षेत्रात नवीन ॲप्रॉन उभे राहील. यामुळे विमान पार्किंग, प्रवासी चढ- उतार, सामान चढविणे आणि उतरविणे आदी सुविधा आणखी सुलभ होतील. तसेच पार्किंगसाठी २५ हजार चौरसमीटर जागा उपलब्ध होणार आहे.

तसेच पॅसेंजर बोर्डिंग, एरो ब्रिज, स्कॅनर आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय विमानतळ सुरक्षेसाठी आवश्यक साहित्याचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. 

आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ व‍िस्तारीकरण अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यामुळे या विमानतळावरील प्रवासी वाहतूक क्षमता वाढणार आहे. सध्या ताशी ३०० प्रवाशी या विमानतळावरून ये- जा करतात.

विस्तारीकरणानंतर ही क्षमता ताशी एक हजार प्रवाश्यापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे नाशिकसह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळून रोजगार वृद्धी होण्यास मदत होणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group