पेठ - नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर वांगणी गावा नजिक आज (दि.९) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास क्रेटा कार ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन कार चालक व एक महिला जागीच ठार झाले.
या राष्ट्रीय महामार्गावरील वांगणी परिसरात गेली सात ते आठ महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याच्या दुरूस्तीकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या मार्गावरील खड्डे चुकविण्याच्या नादात चारचाकी सह दुचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत.
नाशिकहुन गुजरात कडे जाणारा टाटाचा ट्रक क्रमांक जी जे १५ ए व्ही ५४४१ व गुजरात राज्याकडुन नाशिक कडे जाणारी क्रेटा कार क्रमांक एम एच १५ जे एक्स ४०८५ यांच्यात खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी भरधाव वेगात समोरासमोर जबरी धडक झाली.
कार ट्रकच्या खाली पुढील चाकात अडकून कार मधील दोघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला असून दोन किरकोळ जखमी झाले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघातात विरमाभाई नागजीभाई पटेल (वय ४७, रा.बेवटा ता.राह जि. छराद, राजस्थान, हल्ली मुक्काम नाशिक कामटवाडा) व गीताबेन देवाभाई पटेल (वय ३५) हे जागीच ठार झाले .
अपघाताची माहिती मिळताच पेठ पोलीसांनी तात्काळ घटनानास्थळी धावघेत अपघात ग्रस्तांना मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात उपचारा करिता पोहचवले.
मृतदेहाचे पेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
ट्रक चालक अपघात स्थळा पासुन ट्रक सोडुन पळुन गेला. देवाभाई पटेल यांचे फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या अपघाताबाबत पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा.पी एल तुंगार, राऊत, जाधव, पवार, भोये आदी करीत आहेत.