नाशिक :- काठी गल्ली सिग्नल जवळ एमडी ड्रग्स विक्री करताना पाच जणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे आरोपींमध्ये दोन फार्मासिस्ट आणि एका इंजिनियर चा समावेश असून शिक्षित मुलेही ड्रग सेवनाकडे वळू लागले आहेत हे येणाऱ्या पिढीसाठी घातक ठरत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी फैज शब्बीर शेख (वय 23 रा. पखाल रोड, द्वारका) त्याच्या साथीदारांसह सह्याद्री हॉस्पिटल सिग्नल पासून आनंदा लॉन्ड्री जवळ काठे गल्ली सिग्नल कडे जाणाऱ्या मार्गावर एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अमली विरोधी पथकाच्या व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने पोलिसांनी काठे गल्ली सिग्नल जवळ सापळा रचला असता फैज शब्बीर शेख, कार्तिक भगवान दांडदे, अदनान मूरकलाम खाटीक, ताजुद्दीन मोहम्मद रिजवान, राहीन अदनान रिजवान अन्सारी यांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडील 6.5 ग्राम वजनाचा एमडी ड्रग्स व इतर 1200 रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण एक लाख 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वरील सर्व आरोपींविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत.