इंदिरानगर परिसरातील सुपर ग्राहक बाजार दुकानातून अडीच लाखांची रोकड लंपास
इंदिरानगर परिसरातील सुपर ग्राहक बाजार दुकानातून अडीच लाखांची रोकड लंपास
img
Prashant Nirantar



इंदिरानगर परिसरातील बापू बंगल्या जवळ असलेल्या सुपर ग्राहक बाजार या किराणा दुकानात गुरुवारी दि.6 च्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा भंडारे यांना (आज)  दि. 7 च्या सकाळी दुकानाचे शटर उघडे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, दुकानाचे कर्मचारी उत्तम दुशिंग हे नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांनाही शटर वाकलेले व तुटलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ दुकान मालक राहुल शिंदे यांना फोन करून माहिती दिली.

मालकाने लगेच इंदिरानगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, चोरट्यांनी अत्यंत कौशल्याने चोरी करत सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआरच पळवून नेल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळाचे फुटेज मिळू शकलेले नाही.

दुकानाच्या काउंटर मधील रोख रक्कम अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

या प्रकरणी दुकान मालक राहुल शिंदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील इतर दुकानदारांमध्येही या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

इंदिरानगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आस पासच्या परिसरातील तसेच रस्त्यांवरील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group