नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी): उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘हॉटेल नाशिक इन’मध्ये सुरू असलेली एमडी (मॅफेड्रॉन) विक्रीची टोळी उध्वस्त केली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा, उपनगर आणि नाशिक रोड पोलिसांनी संयुक्तपणे केली असून, या प्रकरणात हॉटेल मालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण ३२ ग्रॅम एमडी पावडर आणि इतर साहित्य असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींमध्ये शोएब मुराद खान (३९, रा. हॅपी कॉलनी, वडाळा), शेख मुस्तफा अफजल (१९, रा. खोडेनगर), मोफीज मुज्जमील खान (१९, रा. वडाळा चौक) आणि हॉटेल मालक कपिल देशमुख यांचा समावेश आहे.
‘हॉटेल नाशिक इन’ (नाशिक-पुणे रोड, आयनॉक्स थिएटरजवळ) येथे एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, उपनगर व नाशिक रोड पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. यावेळी रूम क्र. ३०५ मध्ये तिघे संशयित आढळले. तपासात त्यांच्या ताब्यातून ३२ ग्रॅम एमडी पावडर व साहित्य असा ₹२,२३,३८० किमतीचा मुद्देमाल मिळाला.
मुख्य सूत्रधार शोएब मुराद खान याने चौकशीत रूम क्र. ३०५ एमडी विक्रीसाठी दिल्याची कबुली दिल्याने, तसेच हॉटेल मालक कपिल देशमुख याचाही या व्यवहारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, सचिन चौधरी, विशाल पाटील, प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, तसेच सहायक उपनिरीक्षक देवकिसन गायकर, रंजन बेंडाळे, संजय ताजणे आणि कर्मचारी भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, संतोष सौंदाणे, गणेश वडजे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, महेंद्र जाधव, योगेश रानडे, पंकज कर्पे, सुरज गवळी, चव्हाण, संदेश रघवतान, वायकंडे यांनी सहभाग नोंदविला.