नाशिक - गुढीपाडवा तसेच रमजान ईद सण येणार असल्याने या सणांमध्ये विविध दुध व दुग्धजन्यपदार्थ जसे की पनीर, खवा, मावा आदी खाद्य पदार्थांची प्रचंड मागणी असते.
ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंबड येथील एका दुकानावर छापा मारून शेकडो किलो पनीर अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केले आहे
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज अंबड परिसरामध्ये असलेल्या मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट नं. ३०८, साईग्राम कॉलनी या पेढीमध्ये बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाने या पेढीची तपासणी करुन पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा २३९ किलो ग्रॅम इतका साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणी कामी पाठविला आहे. तसेच जप्त करण्यात आलेला संशयित पनीरचा साठा हा नाशवंत असल्याने व तो परत खाण्याच्या उपयोगात येवू नये याकरीता त्यावर निळ टाकण्यात येवून हा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटागाडीत नष्ट करण्यात आला.
या छाप्यातील पनीरचा नमुना विश्लेषणासाठी पाठविण्यात आला असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदिप तोरणे, सुहारा मंडलिक यांनी सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड यांच्या उपस्थित व सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
एफडीएची पथके शहरातील पनीर उत्पादक व विक्रेते, यांचेवर लक्ष ठेवणार असून कधीही, अन कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये, तसेच बनावट पनीरसारखे अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन तत्पर आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त दि.ज्ञा.ताबोळी यांनी दिली.
सण-उत्सव काळात पनीर, पेढे, बर्फी, मिठाई इ. खरेदी करतांना ते दुधापासून बनविले असले बाबत खात्री करून खरेदी करण्याची दक्षता घ्यावी तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क करावा असे आवाहन देखील तांबोळी यांनी केले आहे