नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- अन्न व औषध प्रशासन विभागाने सातपूर व इंदिरानगर येथील मिठाईच्या दुकानावर छापा टाकून परराज्यातून आलेले व दर्जा कमी असलेले तूप हे जप्त केले असून हे दुकानही सील करण्यात आले आहे.
सण-उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईनी शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची देखील दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने देखील खवा, मावा, तुप, तेल व मिठाईच्या शुध्दतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रकारे आरोग्यास हानीकारक ठरेल अशी मिठाई विकली जाऊ नये याकरिता एफडीएकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये, अन्न विषबाधा सारखा अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी काय करावे याबाबत मिठाई उत्पादकांना सूचना देण्यात आल्या होत्या.
तरी देखील मिठाई दुकानदारांकडून निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री केली जात असल्याची घटना समोर आलेली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये सातपूर येथील एक मिठाईच्या दुकानाची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी करुन त्याठिकाणी साठविण्यात आलेल्या परराज्यातून आलेल्या प्रत्येकी १५ कि.ग्रॅ. च्या डब्यातून नमुना साठा घेवून गाय तुपाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित १ लाख ४८ हजर २५५ रु किंमतीचा साठा भेसळयुक्त असल्याच्या संशयाने जप्त करण्यात आला आहे.
नवीन नाशिक परिसरातील इंदिरानगर येथील सम्राट स्विट या पेढीची तपासणी केली असता पेढीचे उत्पादन कक्ष परवाना न घेता मिठाई अन्न पदार्थाची उत्पादन व विक्री करत असल्याचे आढळून आले. परिणामी सदर पेढीची तपासणी करुन तेथून गाय तुप, काजू रोल, मलाई बर्फी असे तीन अन्नपदार्थाचे संशयावरुन नमुने घेऊन उत्पादन कक्षास परवाना नसल्याने व्यवसाय बंदचे निर्देश देण्यात आले आहेत व व्यवसाय बंद करण्यात आलेला आहे.
अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.
ही कारवाई सह आयुक्त म. ना. चौधरी , अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, जी. एम. गायकवाड, एस.जे. मंडलिक, तोरणे, यांनी एम.एम. सानप, सहायक आयुक्त (अन्न) व . व्ही.पी. धवड यांच्या उपस्थित व मार्गदर्शनात करण्यात आली आहे.