नाशिक (प्रतिनिधी): कोणत्याही नियमाचे पालन न करता ड्रिंकिंग वॉटर तयार करणाऱ्या इगतपुरी येथील कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखो रुपयांचे पाणी जप्त केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाचे सहायक आयुक्त, उ.सि. लोहकरे यांच्या समवेत अन्नसुरक्षा अधिकारी गो. वि. कासार यांनी जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे काल मे. साईमेवा फूड ॲण्ड बेव्हरजेस येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी तपासणीत पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असलेले, मिथ्याछाप व लेबलदोषयुक्त साठा आढळून आला.
हे काम कायद्यानुसार आक्षेपार्ह असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी कासार यांनी कमीदर्जा व असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचा साठा असल्याच्या संशयावरुन नमुने घेवून पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरच्या एकूण 21324 पॅक बॉटल्स 1 लिटरच्या, किंमत 4 लाख 26 हजार, 488 छापलेले लेबल्स, 26 रोल्स्, 19 हजार 110 रुपये असा एकूण किंमत 4 लाख 45 हजार 598 रुपये इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. घेतलेले नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगानेेे अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई घेण्यात येईल.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.