महाराष्ट्रातील मानाच्या दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पांडुरंगाच्या दर्शनासाठी २४ तास मुभा देण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने याबाबतची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये येत्या ७ जुलैपासून विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे. मंदिर समितीने याबाबतची माहिती माध्यमांना दिली. आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. वारी सुखरुप पार पडावी, यासाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीमध्ये सहभागी भाविकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एफडीए सज्ज आहे. पालखी मार्गावर 12 ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या आषाढी वारी मार्गावर कडक अन्न तपासणी उपाययोजना राबवेल.
यासाठी पाण्याच्या बाटल्या, प्रसाद आणि तळलेले खाद्यपदार्थ यांची तपासणी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करून नोडल प्राधिकरण म्हणून काम करेल. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांच्या सांगितले जात आहे.