संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना दि. २९ जूनला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील बरडजवळ घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबबत मिळालेल्या माहितीनुसार , तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, नागपूर) व मधुकरराव तुकाराम शेंडे (५५, रा. मेडिकल चौक, नागपूर) अशी त्या मृत झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता. बरड जवळील टोलनाका येथे मुक्कामासाठी टेंट उभारताना तुषारने लोखंडी रॉडला हात लावल्यानंतर त्यांना शॉक बसला. तुषार रॉडला चिटकल्याने त्यांना बाजूला काढण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव हेही तुषार यांना चिटकले तेव्हा दोघांना विजेचा शॉक बसला.
त्यावेळी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला कॉल केला. दोघांनाही उपचारासाठी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले.
मधुकर तुकारामजी शेंडे (५६, राजाबक्षा, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (२२) दोघेही निस्सीम विठ्ठलभक्त होते. शेंडे हे नेहमीप्रमाणे यंदादेखील ते उत्साहाने वारीत सहभागी झाले. बरडजवळ पालखीचा मुक्काम होता. शेंडे व बावनकुळे इतर वारकऱ्यांसह तंबूत विश्रांतीसाठी थांबले होते. कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधत असताना बाजूलाच असलेल्या विजेच्या खांबातून त्यांना जोरात शॉक लागला. दोघेही बेशुद्ध पडले. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली होती.