सध्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. पालख्यांचे आगमन झाल्याने विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. अशातच एक धक्कदायक घटना समोर आली आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभं असलेल्या वारकऱ्याला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत भाविक रक्तबंबाळ झाला. गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीतील आज सकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाच्या रांगेत उभं असलेला भाविक हा नागपूर येथील होता. त्याला खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. भाविकाला झालेल्या मारहाणीचा भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षारक्षावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मारहाणीची घटन समोर आल्यानंतर सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिर समितीने दर्शनासाठी व्यवस्थित रांगेची सोय केली असून, ही रांग गोपाळपूर पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. या रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्याला किरकोळ कारणावरून बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली.