यंदाच्या आषाढी पायी वारीमध्ये प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार
यंदाच्या आषाढी पायी वारीमध्ये प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार
img
Dipali Ghadwaje
पंढरपूर : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर अंतर चालणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकऱ्यांना चार दिवस मोफत अन्नदान करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी पंढरपुरात दिली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आज दर्शन बारी, वाखरी पालखीतळ, ६५ एकर परिसराची पाहणी करून माहिती घेतली.

पाहणीनंतर मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री आषाढी पालखी सोहळ्यात चालणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. पंढरपूरला आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातले आहे.

त्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर व पालखी परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री आषाढी यात्रेच्यापूर्वी पंढरपूरचा पाहणी दौरा करणार आहेत.

याशिवाय यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाखरी ते पंढरपूर असा पायी वारी देखील करणार आहेत. आषाढी यात्रेपूर्वी ठाणे जिल्ह्यातील एक विशेष पथक आषाढी यात्रेमध्ये काम करणार आहे. लवकरच हे पथक पंढरपूरमध्ये येणार असून आषाढी यात्रेनंतर देखील हे पथक काम करणार आहे, असेही चिवटे यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group