विधानसभा निवडणूकितील महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर अनेक चर्चाना उधाण आले असून ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव इथे गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू आहे. बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे हे दरेगावला का गेले? ते नाराज आहेत का? असा सवाल सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता. यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे. सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.