महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान महायुतीत शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांनी काही जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. यामुळे या ठिकाणचे उमेदवार चिंतेत आहेत. एकीकडे महायुतीत आहे म्हणायचे आणि दुसरीकडे एकमेकांविरोधात प्रचार करायचा अशी परिस्थिती या उमेदवारांवर आहे.
शिंदेंनी हेलिकॉप्टरने या उमेदवारांना एबी फॉर्म पोहोचविले होते. अशातच श्रीरामपूरच्या उमेदवाराने एकनाथ शिंदेंची सभा आयोजित केली होती. परंतू ऐनवेळी शिंदेंनी ही सभा रद्द केल्याने उमेदवार अत्यवस्थ झाला आहे. या उमेदवाराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे हे कांबळेंसाठी आज सभा घेणार होते. परंतू, अचानक ही सभा रद्द करण्यात आली. शिंदे येणार नसल्याने कांबळे यांचा रक्तदाब वाढला आणि ते अत्यवस्थ झाले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सभा घेत आहेत. कानडेंसाठी तटकरे यांनी सभा घेतली आहे. शिंदे यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली असली तरी शेजारीच असलेल्या नेवासामध्ये त्यांची सभा होत आहे. यामुळे ही सभा रद्द करण्यामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे. शिंदेंनी सभा रद्द केल्याचे समजताच कांबळेंचा रविवारी रात्रीच रक्तदाब वाढला. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.