महायुतीला ऐतिहासिक बहुतम मिळून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सत्तेचं वाटप कसं होणार? मुख्यमंत्री कोण होणार? यासारख्या प्रश्नांवर चर्चा सुरु असून त्यावर तिन्ही पक्षांना मान्य होईल असा समाधानकारक तोडगा निघालेला नाही. मात्र असं असतानाच वेगवेगळ्या शक्यतांसंदर्भातील बातम्या समोर येत आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र आता यावर स्वत: श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली.
त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत," असा खुलासा श्रीकांत शिंदेंनी केला आहे.
तसेच पुढे बोलताना श्रीकांत शिंदेंनी, "लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे," असंही म्हटलं आहे.
"माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा," असा खोचक टोलाही पोस्टच्या शेवटी श्रीकांत शिंदेंनी प्रसारमाध्यमांना लगावला आहे.