आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्रसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो. माऊली माऊलीचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढरीची वाट धरतात. अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या आहेत. मात्र, या वारीतच लुटण्याचा आणि अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्यांना अडवून लुटण्याचा आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली आहे.
चहासाठी काही जण थांबले होते, त्यानंतर गाडीत बसताना २ जण दुसऱ्या दिशेनं गाडीवरून आले. आरोपींनी आधी २ जणांच्या गळ्याला कोयता लावला आणि त्यांना लुटलं. नंतर एका अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
दौंडच्या चिंचोलीमध्ये दोन जणांनी पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकांना लुटलं. गळ्याभोवती कोयता ठेवत त्यांच्याकडील ऐवज लुटला. नंतर त्याच परिसरातील मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीला आधी काही अंतरावर नेलं. निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला आणि तेथून पळ काढला.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून, आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिंसाकडून शोध सुरू आहे.