महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता सर्वाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. याबाबत आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मी लाडका भाऊ हे पद मिळवलं आहे. ही मोठी ओळख आहे. काल मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना मी कुठलीही अडचण आणणार नाही. मला अडीच वर्ष संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल.
एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे असं वाटू देऊ नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल, असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सांगितल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.