राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. हाच तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांची राज्यातील नेत्यांनी भेट घेतली. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित होते.
याचबरोबरच अजित पवाराचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलांसहीत सुनिल तटकरेही उपस्थित होते. शिंदेंकडूनही शंभूराज देसाई आणि उदय सामंत या ठिकाणी उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या आसपास संपलेल्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदेंनी बैठक सकारात्मक झाली असून मुंबईत आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं.
या भेटीदरम्यानचे काही फोटो समोर आले असून एका फोटोत फडणवीस अमित शाहांना पुष्पगुच्छ देत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या शिंदेंचा चेहरा पडलेला दिसत आहे. यांसंदर्भातही पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी यावरही प्रतिक्रिया नोंदवली.
तो फोटो कोणता?
फडणवीस यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर रात्री 12 वाजून 36 मिनिटांनी दोन फोटो आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट केले. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून या महत्वाच्या लढाईमध्ये जी साथ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, प्रेरणा दिली याबद्दल त्यांचे आज नवी दिल्ली येथे मनःपूर्वक आभार मानले! यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते, सहकारी उपस्थित होते," अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.
फडणवीसांनी पोस्ट केलेल्या एका फोटोत अजित पवार केंद्रीय गृहमंत्र्यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. फोटोत जे. पी. नड्डा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिसत आहेत. या फोटोत सर्व हसत असले तरी शिंदेंच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाहीये. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये फडणवीस अमित शाहांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. मात्र या फोटो शाहांच्या बाजूला उभे असलेले एकनाथ शिंदे धीर गंभीर मुद्रेत पाहायला मिळत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. खास करुन शिंदे, फडणवीस आणि शाहांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा असतानाच शिंदेंना या फोटोबद्दल विचारण्यात आलं.
त्या फोटोबद्दल शिंदे काय म्हणाले?
अमित शाहांबरोबरचा तुमचा फोटो समोर आला त्यामध्ये तुमचा चेहरा पडलेला, गंभीर दिसतोय, असं म्हणत या बैठकीनंतर पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न विचारला. या प्रश्नाला शिंदेंनी उत्तर देताना, "तुम्हाला कधी गंभीर, कधी हसरा... तुम्हीच काय काय ठरवता," असं म्हणत हसले. त्यानंतर शिंदेंनी, "आजही मी खुश आहे. जे आम्ही दोन अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काम केलं, कल्याणकारी योजना दिल्या त्याचा रिझल्ट या निवडणुकीत पाहायला मिळाला. आतापर्यंत कधीच एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या मिळाल्या. याचा अर्ध काय तर जनता सरकारच्या कामावर खुश आहे. सराकरच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. यातच आम्ही समाधानी आहोत," असं उत्तर दिलं.