नाशिक जिल्ह्यात
नाशिक जिल्ह्यात "या" चहा विक्रीच्या दुकानावर एफडीएचा छापा; 560 किलो चहा पावडर जप्त
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - दिंडोरी येथील नाशिक टी कंपनी वर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून लाखो रुपयांची संशयास्पद भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध पुरवठा विभागाच्या वतीने सातत्याने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा दुकान यासह विविध ठिकाणी तपासणी चालू आहे. त्यातून भेसळखोरांना रोखण्याचे काम सुरू आहे. अशीच एक कारवाई आज नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी दिंडोरी येथे नाशिक-कळवण रोडवरील बाजारपेठेत असलेल्या नाशिक टी कंपनी वर छापा टाकला असता त्यांना या ठिकाणी उपलब्ध असलेल्या चहा पावडरची कोणतेही लेबल नसल्याचे आढळून आले. तसेच त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.

या दुकानदाराकडे चहा पावडर साठवण्यासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नसल्याचे देखील सापडले असून या चहा पावडरची तपासणी केली असता ती संशयास्पद भेसळयुक्त असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आलेले आहे. त्यामुळे दोन लाख एक हजार सहाशे रुपये किमतीची 560 किलो चहा पावडर जप्त करण्यात आली आहे. दुकानदाराने पुढे व्यवसाय न करण्याचे आदेश देण्यात आलेले असून दुकान बंद केले आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त उदयभक्त लोहकरे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, नमुना सहाय्यक विजय पगारे यांच्या पथकाने केली आहे.

येणारा काळ हा सणासुदीचा असुन व्यापाऱ्यांनी तसेच अन्नपुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांनी कोणत्याही प्रकारचा भेसळयुक्त माल नागरिकांना विकू नये. तसा प्रयत्नही करू नये. सातत्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने धडक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी देखील आपण घेत असलेले अन्नपदार्थ तसेच साहित्य हे योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह. आयुक्त उदयभक्त लोहकरे यांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group